नागपूर :शनिवारी संध्याकाळी भोळे पेट्रोल पंप चौकावर भर रस्त्यात हत्या झालेल्या किशोर उर्फ बाल्या बिनेकरची अंत्ययात्रा काल संध्याकाळी त्याच्या शांतीनगर परिसरातील घरातून निघाली. कोरोना असतानाही हजारो लोक त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेले. अनेकांनी मास्कही लावले नव्हते. पोलिसांनी या हत्या प्रकरणात आतापर्यंत चेतन हजारे या मुख्य आरोपीसह चार जणांना अटक केली आहे. तर एक आरोपी अजून फरार आहे.
मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस शिपाई आणि एका रिक्षाचालकावर लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच पोलीस स्टेशनमधील निलंबित पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरुन या महिलेने ही खोटी तक्रार दाखल केली होती. या महिनेले याच पोलीस ठाण्यात तिच्यावर आणि तिच्या अकरा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि धमकवल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र ही तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झाल्याने या महिलेवर तसेच तिला हे करण्यास सांगणाऱ्या घाटकोपर पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक युसुफ शेखवर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्या 29 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. परिमंडळ सातचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी कांजूरमार्ग पोलिसांकडे हा तपास दिला होता. मात्र या तपासात या महिलेने केलेले सर्व आरोप खोटे ठरले आहेत. महिलेने जेव्हा गुन्हा घडल्याची वेळ सांगितली तेव्हा यातील एक पोलीस शिपाई उत्तर प्रदेशात एका गुन्ह्याची उकल करण्यास गेले होते. तर दुसरे हे पोलीस ठाण्यात हजर होते तर रिक्षाचालक त्याच्या साकीनाका येथील घरी झोपला होता. यामागे घाटकोपर पोलीस ठाण्यातील काही महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आलेल्या युसूफ शेख या पोलीस उपनिरीक्षकाचा हात असल्याचे समोर आले आहे. आपल्या निलंबनामागे या दोन पोलीस शिपायांचा हात असल्याचे युसूफ शेखला वाटत होते, म्हणून त्याने या महिलेशी संगनमत करुन हा कट रचत. या पोलीस शिपाई आणि घाटकोपर पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या घाटकोपर पोलीस युसूफ शेखचा शोध घेत आहेत.
जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने पाऊस पडत असल्याने भाजी वर्गीय पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक कमी झाल्याने मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. भाज्यांच्या दराचा विचार केला तर किरकोळ बाजारात मेथी, पालक, कोथिंबीर या शंभर रुपयांच्या वर जाऊन पोहोचल्या आहेत तर गवार, टोमॅटो 80, शेवगा 100, गिळके दोडके गिलके 70, पट्टाकोबी 60, भेंडी 40, बटाटे 40 रुपये प्रतिकिलो दराने किरकोळ बाजारात विकले जात आहेत. वाढलेल्या या भाज्यांचे दर नोकरदार वर्गाला परवडणारे असले तरी सर्वसामान्य माणसाला मात्र परवडणारे नसल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे आज भाजीपाल्याच्या किंमती कडाडल्या आहेत. सततच्या पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याने भाजी मंडईमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाज्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. कधी नव्हे ते पालक, मेथी, मिरची, टोमॅटो दुपटीपेक्षा जास्त दराने आज मार्केटमध्ये विकले जात आहे. मुंबईतील दादर भाजी मार्केटमध्येही हीच स्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनामुळे नागरिक त्रस्त असताना आता भाज्यांचे भाव कडाडल्याने भाजी विक्रेते आणि ग्राहक दोघांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
Post a Comment