सोलापूर जिल्ह्यातील 1806 सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबणीवर, दूध पंढरी, शिवामृत, पांडुरंग, विठ्ठलराव शिंदे, सिध्देश्वर, जनता बॅंकेचा समावेश |
- कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नसल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील निवडणूकीला पात्र असलेल्या सहकारी संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना त्यामुळे मुदतवाढ मिळाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अ, ब, क व ड वर्गातील 1 हजार 806 सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबणीवर गेल्या आहेत.
जिल्ह्यातील 189 सहकारी संस्थांच्या निवडणूका डिसेंबर 2019 अखेरपर्यंत निवडणूका प्रलंबित होत्या. 2020 मध्ये जिल्ह्यातील 1 हजार 617 सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचा कालावधी पूर्ण होत आहे. निवडणूका प्रलंबित असलेल्या व 2020 मध्ये निवडणूकीस पात्र असलेल्या अशा एकूण सहकारी संस्थांची संख्या ही 1 हजार 806 आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अनेक नामवंत व सहकारी संस्थांचा समावेश आहे. सध्या सहकारात नसलेल्या आणि मल्टिस्टेट झालेल्या सिध्देश्वर साखर कारखाना व सोलापूर जनता सहकारी बॅंकेचाही यामध्ये समावेश आहे.
या दोन मोठ्या संस्थांशिवाय माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, माळशिरस तालुक्यातील पांडुरंग सहकारी साखर कारखाना व शिवामृत सहकारी दूध संघाचाही समावेश आहे. या शिवाय सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचीही निवडणूक आता लांबणीवर पडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याचे मोठे आव्हान सहकार विभाग व सहकारी निवडणूक प्राधिकरणासमोर असणार आहे.
आकडे बोलतात...
निवडणूकीला पात्र असलेल्या संस्था
अ वर्ग : 3
ब वर्ग : 831
क वर्ग : 495
ड वर्ग : 288
डिसेंबर 2019 पर्यंत निवडणूक प्रलंबित असलेल्या संस्था
अ वर्ग : 0
ब वर्ग : 11
क वर्ग : 160
ड वर्ग : 189
Post a Comment